Ad will apear here
Next
आदर्श गुरू आणि वारसा जपणारे शिष्य
कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) येथील दिवंगत वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके यांची जन्मशताब्दी नुकतीच साजरी करण्यात आली. त्यांनी निरपेक्ष भावनेनं केलेल्या वेदांच्या अध्यापनातून अनेक विद्यार्थी घडविले. त्याशिवाय सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं कार्यही उल्लेखनीय होतं. त्यांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूच्या स्मरणार्थ विशेष सोहळा आयोजित केला होता. त्यात उच्चशिक्षित वेदमूर्तींचा सन्मान करण्यात आला. तसंच गुरुजींचं कार्य पुढे नेण्याच्या दृष्टीनेही विचारमंथन करण्यात आलं. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेणारा हा लेख...
.............
एक अतिशय हृद्य असा सोहळा नुकताच अनुभवता आला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसजवळच्या कुर्धे या गावातले दिवंगत वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके तथा जनूकाका यांच्या जन्मशताब्दीचा तो सोहळा होता. यतेआराधना आणि तीर्थराजपूजा हे विशेष धार्मिक विधी त्या निमित्तानं करण्यात आले आणि उच्चशिक्षित वेदमूर्तींचा सन्मानही करण्यात आला. तसं पाहायला गेलं, तर तो सोहळा कौटुंबिकच होता; पण इथे कुटुंब हा शब्द घरातल्या केवळ चार माणसांपुरता अभिप्रेत नाही, तर जनूकाकांच्या गावोगावी पसरलेल्या कित्येक विद्यार्थ्यांचाही त्यात समावेश आहे. कारण विद्यार्थी म्हणजे जनूकाकांचं विस्तारित कुटुंबच होतं. विद्यार्थी आपल्या गुरूप्रति असलेली आदराची, कृतज्ञतेची भावना कशी उत्तम प्रकारे व्यक्त करू शकतात, याचा हा सोहळा म्हणजे आदर्श वस्तुपाठ होता. त्याची नोंद व्हावी, एवढाच या लेखनप्रपंचाचा उद्देश.

ज्या गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम करावंसं विद्यार्थ्यांना वाटलं, त्या जनूकाकांविषयी थोडंसं. वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके (जन्म : २५ नोव्हेंबर १९१८, मृत्यू : २२ सप्टेंबर २००९) हे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. वेदाध्ययन करणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या जनूकाकांनी तो वारसा जन्मभर जपला आणि तो वृद्धिंगतही केला. त्यांचे लौकिक शिक्षण फारसे झाले नव्हते; मात्र लहानपणीच ते वेदपाठशाळेत दाखल झाले आणि वेदमूर्ती दिनकरभट्ट फडके यांच्याकडे त्यांचं याज्ञिकी शाखाध्ययन झालं. पुढे वडिलांबरोबर ते याज्ञिकी करू लागले. ऋग्वेदाच्या शाकल शाखाध्ययनाबरोबरच त्यांनी यजुर्वेदाचाही अभ्यास केला. वेदशास्त्रोत्तेजक सभेची शाखा परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. 

बंधू विश्वनाथ जमखंडीच्या पटवर्धन संस्थानात पौरोहित्य करायला गेलेले असताना त्यांच्यासोबत जनूकाकांनीही ती जबाबदारी उत्तम रीतीनं निभावली. पुढच्या काळात, गावातील वेदपाठशाळा फंड संस्थेतर्फे सुरू असलेली वेदपाठशाळा त्यांनी सुमारे २५ वर्षं सांभाळली आणि सुमारे ८५-९० विद्यार्थी घडविले. ही वेदपाठशाळा १००हूनही अधिक वर्षांची आहे. कारण ती सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये जनूकाकांच्या वडिलांचाही सहभाग होता. टप्प्याटप्प्याने गावातल्या अनेकांनी तिची जबाबदारी सांभाळली आणि वेगवेगळ्या ठिकाणी आणि नंतर गावातल्या महाविष्णू सर्वेश्वर मंदिरात ती सुरू होती. नंतर या शाळेची जबाबदारी जनूकाकांकडे आली; मात्र त्यांना वयोमानानुसार दररोज मंदिरात जाऊन शिकविणं शक्य नसल्यानं त्यांनी आपल्या घरीच विद्यार्थ्यांना शिकविणं सुरू केलं. या शिक्षणात कोणताही व्यवहार नव्हता. अनेक विद्यार्थ्यांची राहण्या-जेवण्याची सोयही त्यांच्या घरीच होती आणि एकही पैसा न घेता अत्यंत तळमळीनं विद्यादान केलं. पौरोहित्यासाठी गेलेले असताना ते यजमानाला कधीही मोबदला सांगत नसत, अशी आठवण आजही अनेक जण सांगतात. त्यांची निरपेक्षता अशा अनेक उदाहरणांवरून दिसून येते.

एरव्ही अत्यंत प्रेमळ असलेले जनूकाका शिकविण्याच्या वेळी मात्र अत्यंत कडक असत. त्यात कोणतीही हयगय केलेली त्यांना चालत नसे, असं त्यांचे विद्यार्थी सांगतात. पहाटे ठरलेल्या वेळी पठणाला सुरुवात होई. संस्कृतचं विशेष अध्यापनही ते करायचे. व्याकरणशुद्ध मंत्रोच्चारांवर त्यांचा भर असायचा. त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी ऋग्वेद संहिताध्ययन पूर्ण केलं.  

मुंबईची ब्राह्मण सभा, मध्य प्रदेशातल्या इंदूरमधली श्री नरहरगुरू वैदिकाश्रम ही संस्था, तसंच कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्याकडून त्यांचा विशेष सन्मान झाला होता. दिल्लीतल्या वेदसंमेलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. 

ते उत्तम शेतकरीही होते. वेदांचा अभ्यास-अध्यापनाबरोबरच शेती-बागायतीची आवड त्यांनी अगदी अखेरच्या काळापर्यंत उत्तम प्रकारे जोपासली होती. आंब्या-फणसाच्या झाडावर चढण्यापासून झावळ्यांची झापं विणणं, द्रोण-पत्रावळी तयार करणं, हिराचे झाडू तयार करणं, काथ्या काढणं, सूत काढणं या गोष्टीही ते कुशलपणे करायचे. गावातल्या उत्सवात गरज पडल्यास पुराणवाचन, कीर्तन, प्रवचन करणं, पेटी वाजवणं या गोष्टीही ते सहजपणे करायचे. कुर्धे-मेर्वी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. गावातलं पहिलं गोबर गॅस संयंत्र स्वतःच्या घरी सुरू करून त्यांनी गावाला ऊर्जेच्या नव्या स्रोताची दिशा दिली. गोबरगॅसचा प्रसार करण्याचं कामही त्यांनी केलं. गावात आठ गोबरगॅस प्रकल्प त्यांनी उभारले. त्यांना आधुनिकतेची आस होती ती अशी. सरपंचपदाच्या काळात गावातल्या सार्वजनिक विहिरीसह विविध सामाजिक कामं त्यांनी केली होती. 

गुरूंना वंदन करण्यासाठी एकत्र आलेले विद्यार्थी

अशा या गुरूच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुमारे ५० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा सोहळा अत्यंत उत्तम पद्धतीनं आयोजित करून पार पाडला. जनूकाकांच्या जन्मतिथीला म्हणजेच कार्तिक वद्य अष्टमी आणि नवमी (३० नोव्हेंबर आणि एक डिसेंबर २०१८) असे दोन दिवस कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या दिवशी उदकशांत, पुण्याहवाचन, व्यासपूजा, पवमान, रुद्र, सौर, ब्रह्मणस्पती आणि रुद्रसूक्ताचा जप, वेदमूर्ती प्रभाकर पाध्ये यांचं प्रवचन, मंत्रजागर, आरती-मंत्रपुष्प, आगवे गावातल्या मुळ्ये मंडळींचं भजन, भोवत्या असे कार्यक्रम झाले. दुसऱ्या दिवशी यतेआराधना आणि तीर्थराजपूजा हे धार्मिक विधी करण्यात आले. दुसऱ्या दिवशीचे हे विधी वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मीळ आहेत. ब्रह्मीभूत झालेल्या, संन्यस्त आणि निरपेक्ष वृत्तीच्या आणि योगी असलेल्या व्यक्तींसाठीच यतेआराधना हा विधी केला जातो. यतेआराधना म्हणजे गुरू, परम गुरू (गुरूंचे गुरू) आणि परात्पर गुरू (गुरूंच्या गुरूंचे गुरू) यांचं पूजन. या विधीमध्ये गुरूपूजन झाल्यानंतर त्यांच्या पदतीर्थाची पूजा करून नृत्य केलं जातं. या विधीला तीर्थराजपूजा असं म्हणतात. 



वेदमूर्ती दत्तात्रय साधले, वेदमूर्ती सिद्धेश मुंडले, गुहागरच्या दुर्गादेवी वेदपाठशाळेचे गुरुजी वेदमूर्ती सोहनी, वेदमूर्ती केतन शहाणे, वेदमूर्ती प्रद्युम्न ठाकूर, चिपळूणचे वेदमूर्ती सुधीर जोशी या उच्चशिक्षित वैदिक ब्राह्मणांना या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं. आपल्या गुरूप्रमाणेच या क्षेत्रातलं उच्च शिक्षण घेऊन तसं कार्य करणाऱ्या गुरूसमान व्यक्तींचा सन्मान व्हावा, ही भावना त्यामागे होती. वेदमूर्ती चंद्रकांत नामजोशी हे संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आचार्य होते. त्यांच्यासह वेदमूर्ती प्रभाकर पाध्ये आणि वेदमूर्ती प्रकाश जोशी यांनी याज्ञिकी विभागाची जबाबदारी सांभाळली. 

नितीन अभ्यंकर, प्रसाद फडके, शरद नामजोशी, योगेश जोशी, गणेश जोशी, ओंकार ओक हे विद्यार्थी स्थानिक किंवा परिसरातील असल्यामुळे मुख्य नियोजन त्यांनी केलं होतं. बाहेरगावी असलेल्या विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग घेतला. सुमारे ५० विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

नितीन अभ्यंकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘आमचे गुरू अत्यंत निःस्पृह होते. आज आम्ही जे काही आहोत, ते त्यांच्यामुळेच. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही तरी करावं असं डोक्यात होतं; मात्र काय ते ठरत नव्हतं. दरम्यान, त्यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य लक्षात आले. त्यानंतर सहज बोलता बोलता हा कार्यक्रम करायचं ठरलं. वेदमूर्ती चंद्रकांत नामजोशी यांनी यतेआराधना हा विधी करण्याची कल्पना सुचविली. आमच्या गुरुजींनी अत्यंत निरपेक्षपणे वेदांची सेवा केली, विद्यार्थी घडविले. समाजाचं चांगलं चिंतण्याची भावना त्यांच्यामध्ये सदैव जागृत होती. हा विधी संन्यस्त वृत्तीच्या आणि ब्रह्मीभूत झालेल्या व्यक्तींसाठी केला जातो. आमचे गुरू त्यांच्या आचरणानं त्याच पदापर्यंत पोहोचले होते, अशी आमची भावना आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी हा विधी करायचं ठरवलं. कल्पना मांडल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी ती उचलून धरली आणि अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळेच हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडू शकला.’

प्रसाद फडके म्हणाले, ‘दर वर्षी गुरुपौर्णिमेला गुरूंच्या घरी जाऊन त्यांना वंदन करून स्मरण केलं जातंच; मात्र जन्मशताब्दीचं औचित्य सहज लक्षात आल्यानंतर अगदी थोडक्या दिवसांत या कार्यक्रमाचं नियोजन करून तो पार पाडता आला, याचं समाधान आहे. त्या निमित्तानं, उच्चशिक्षित आणि उत्तम वेदाध्ययन केलेल्या वेदमूर्तींचा सन्मानही आम्हाला करता आला, हे भाग्य आहे. आम्ही विद्यार्थीही त्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी एकत्र जमू शकलो, याचाही आनंद आहे.’ 

हे विद्यार्थी केवळ हा कार्यक्रम करून थांबलेले नाहीत, तर गुरूंचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी गावातली सध्या बंद असलेली वेदपाठशाळा सुरू करण्याबद्दल विचारविनिमय सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या समारोपानंतर जमलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या चर्चेमध्ये हा मुद्दा मांडण्यात आला. प्रत्येक जण आपापल्या व्यापात आणि वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा लांबच्या शहरांमध्ये असल्यानं वेदपाठशाळा सुरू करणं ही सहज शक्य होणारी गोष्ट नाही; मात्र ती सुरू व्हावी, यासाठी ठोस प्रयत्न करण्याबद्दल या चर्चेत विचारमंथन करण्यात आलं. 

चांगल्या इच्छेच्या पूर्तीसाठी कोणत्या ना कोणत्या मार्गानं निश्चित बळ मिळतं, असं म्हटलं जातं. तसंच याही बाबतीत होईल, अशी खात्री वाटते. वेदांमध्ये खूप मोठा ज्ञानाचा साठा आहे, हे आपल्याला माहिती आहे; मात्र असं नुसतं म्हणत राहून किंवा त्यांचा केवळ अभिमान बाळगून वेद जपले जाणार नाहीत. त्यासाठी त्यांचा अभ्यास करण्याची परंपरा पुढे सुरू राहणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं या विद्यार्थ्यांचा हा विचार अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘केवळ गुगल हाच गुरू’ असं मानण्याच्या आजच्या काळात आपल्या गुरूंच्या स्मरणासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी असा कार्यक्रम होणं आणि त्यांचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टीनं विचारमंथन होणं निश्चितच अभिनंदनीय आहे.

(वेदमूर्ती जनार्दन ना. फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे कुटुंबीय, स्नेही आणि विद्यार्थी यांनी लिहिलेल्या आठवणींचे ‘जनाशताब्दी’ हे पुस्तक या कार्यक्रमादरम्यान प्रकाशित करण्यात आले. ते ई-बुक स्वरूपात ‘बुकगंगा’वर मोफत उपलब्ध आहे.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZXBBV
 खूप छान लिहिलंयत! आमच्या गावातील अशा नररत्नाचा सन्मान केला गेला ही खूप आनंददायी गोष्ट आहे! आजोबांना विनम्र अभिवादन!!💐💐1
Similar Posts
५० वर्षांनी कुर्ध्यात पुन्हा रंगले टिपऱ्यांचे खेळ! ऐकताच कानी मधुर मधुर ध्वनी वादन करी हरी प्रेमभरे टिपऱ्या गोपी गोप सारे अशी हरिमाया... कुर्धे (ता. जि. रत्नागिरी) येथील श्री महाविष्णु-सर्वेश्वर मंदिरांच्या वातावरणात सध्या अशा टिपऱ्यांच्या गाण्यांचे स्वर घुमून राहिले आहेत... त्यांच्या सोबतीला आहे टिपऱ्यांचा लयबद्ध नाद, घुंगरांचा किणकिणाट, तबला-पेटीचे
गुरु: साक्षात् परब्रह्म। ‘‘मी कोण, कुठून आलो, कुठे जाणार?’ या प्रश्नांची उत्तरं प्राप्त होऊन, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका म्हणजेच अध्यात्म. हे ज्ञान ज्याच्या सान्निध्यात मिळतं, तो आध्यात्मिक गुरू. मुमुक्षूला म्हणजे मोक्षाची इच्छा असलेल्या व्यक्तीला गुरू शोधावा लागत नाही. गुरूच आपल्या योग्य शिष्याला आपल्याजवळ बोलावून घेतो किंवा स्वतः त्याच्याकडे जातो
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक - हातिसचा उरूस रत्नागिरीपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हातिस या चिमुकल्या गावात पीर बाबरशेख यांचा उरूस गेली अनेक वर्षे साजरा होतो. हा उरूस वैशिष्ट्यपूर्ण असून, हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जातो. यंदा हा उरूस आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी होत आहे. या उरुसाबद्दल मुंबई आणि हातिस येथील हातिस ग्रामविकास मंडळातर्फे देण्यात आलेली ही माहिती
कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव : पालखी नाचवणे, पालखीभेट (व्हिडिओ) कोकणातला शिमगोत्सव म्हणजे विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धती, परंपरा, लोककला यांचा आविष्कार असतो. फाक पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणात शिमग्याचे महत्त्व आणि उत्साह दिवाळीपेक्षा किती तरी अधिक. बाहेरगावी असलेले चाकरमानीही हमखास शिमगोत्सवासाठी गावी येतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language